सावरकरांची शिव-आरती, मुस्लिमद्वेष आणि शिवाजी महाराजांचे संघीकरण

सध्याची परिस्थिती आपल्याला आणीबाणीची तर म्हणता येणार नाही पण युद्धाची तरी म्हणता येईल. डिसेम्बर महिन्याच्या १९-२० तारखेला काही येडसर लोकांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विडंबन केले आणि आज आपण बघतोय कर्नाटक मध्ये हिजाब ला धरून तरणी पोर रस्त्यावर उतरून काय करत आहेत. देशातल्या मुस्लिम समाजाला ज्या प्रकारे छळलं जातंय किंवा छळलं गेलंय त्या मागे काय धोरणे होती ते काही लपून नाहीत. ध्रुवीकरण झालेले राजकारण आणि धर्मांधतेला मुस्लिम समाजाचा नायनाट बघायचाच आहे. मुस्लिम समाजाचा नायनाट का करायचं आहे? या मागची काही कारणे शोधली तर आपल्याला उत्तरे अशी भेटतात कि; मुस्लिमांनी मंदिरे लुटली, हल्ले चढवले किंवा मग इथल्या स्त्रियांवर अत्याचार केला किंवा मग ते आतंकवादी असतात इत्यादी इत्यादी. अजून महत्वाचं एक म्हणजे मोदी लाटेने आणि ब्राम्हणी पुस्तकी व्यवस्था सांगते कि सुमारे १० वे शतक ते १७ वे शतक मुस्लिम हे या भूमीवरती चढाया करत आले. त्यांनी मंदिरे हि लुटली. मोहम्मद गजानवीं यांनी तर आत्ता गुजरात मध्ये वास्तव्यात असलेले सोमनाथ मंदिरातली सोने २४ वेळा स्वाऱ्या करून लुटले. हि कारणे जवळजवळ नेहमीच असतात पण गुजरातच्या त्या सोमनाथ मंदिराला सोन दान करणारे कोण होते? आणि ते मंदिर कोणाच्या ताब्यात होते असा सवाल अजूनही कोणीं विचारत नाही. मुस्लिमांकडून मग शिवाजी महाराज्यांनी या भूमीला सोडवलं असे नरेशन्स आहेत.

कालांतराने परदेशी मुस्लिम इथलेच झाले. इथल्या मूलनिवासी जनतेला जबरदस्तीने किंवा मग काही इच्छेने मुस्लिम धर्मातर करण्यात आले. जे काही उरले होते किंवा मग राहिले होते ते धर्मांतर झालेलेच होते आणि आहेत. पण तेव्हापासून चालू झालेला मुस्लिम द्वेष काय म्हणतो? इथल्या मंदिरात चालणारी सत्ता काय म्हणते?

स्वातंत्र्यवीर म्हणवल्या जाणाऱ्या सावरकरला काळ्या पाण्याची सजा होते. तो इंग्रजांकडून माफी मागतो, बाहेर निघतो आणि मुस्लिम द्वेष पसरवायला सुरुवात करतो. याच्या मागचं नेमकं कारण काय म्हणता येईल? इंग्रजांची divide and rule कट-सिंद्धांते त्यांचा पाया घट्ट’ बसवण्यात तेवढीच काम करत होती जेवढी या भूमीला लागलेली मुस्लिम द्वेष राजकारण. सावरकर शिवाजी महाराजांचं सोयीचे म्हणजेच गो-ब्राम्हण स्वराज्य तर स्वप्नात बघत होते आणि सावरकरच काय तर हेडगेवार, गोळवलकर, टिळक[1] अश्या साऱ्या मराठी ब्राम्हण मंडळी पण सामान्य जनतेमध्ये मुस्लिमद्वेष पेरण्याचे काम किंवा मग हिंदवी ध्रुवीकरण शिवाजी महाराजांचे आड करीतच होते आणि तत्कालीन इतिहासकार त्या सगळ्या द्वेषाला स्वातंत्र्य संग्रामात रूपांतर करण्यात व्यस्त होते.

शिवाजी महाराजांचे संघीकरण करण्यामागचे सावरकर रचित शिव-आरतीचे मोलाचे योगदान आहे. शिव-आरती प्रत्येक संघाच्या शाखे मध्ये मोठ्या स्पीकर वर लावली जायची. संघ प्रणित शाळा कॉलेज मध्ये ती आजही ऐकवली जाते. भुरळ लागलेली आहे लोकांना सावरकरांच्या शिव-आरतीचा. सावरकरांच्या जिवंतपणीच ती आरती रेकॉर्ड करण्यात आली आणि तेव्हाच्या रेडिओ चॅनेल्स वर ती ऐकवली हि जायची. नंतर हृदयनाथ मंगेशकर ने ती आरती संगीतबद्ध केली आणि भारतरत्न लता मंगेशकरच्या आवाजाने तिला अजून एक नवीन वलय लावण्यात आला. मुस्लिम द्वेष मग अजून जास्त प्रमाणात पेरला गेला. लता मंगेशकर ने गायलेली शिव-आरती हि काठ्या लाठ्या शिकवण्या अगोदर वाजवली जायची/जाते.

सावरकर-गोळवळकर आणि टिळक एवढे मुस्लिम द्वेष कशाकरिता पसरवत होते? आणि त्यांना इतिहासकारांनी स्वातंत्र्यांचे जनक का म्हटले असेल?

शरद पाटील लिहतात – मुसलमानांचा नाश कशाकरता तर वर्णधर्माची म्हणजे शूद्रातिशूद्रांची गुलाम गिरीची व नरकयातनांची पुनर्स्थापना करण्याकरता[2]. पाटलांचे हे वाक्य जर थोडं विचारार्थी बघितलं तर लक्षात येईल कि हिंदुत्व पेरण्याची ब्राह्मणी मांदियाळी हि मुस्लिम द्वेष पसरवून तिच्या आड इथल्या बहुजन जनमतावर वर्णव्यवस्थेचे आणि गुलामगिरीची सावट नेहमी राहावे या साठीच. कारण हिंदू म्हणून इथली वर्ण आणि जातीने वाटली गेलेली जनता अजून हि त्याच विळख्यात राहावी म्हणून. मुस्लिम द्वेषच एक कारण आजही दिसते संघकृत सरकारे मुस्लिम द्वेष करतातच. नुकत्याच जामिया मिलिया विद्यापीठावर हल्ला आणि दिल्लीत घडवला गेलेला नरसंहार त्याचेच उत्तम उदाहरण आहेत.

सावरकर त्यांच्या त्या शिव-आरती मध्ये शिवाजी महाराजांना सरळ सरळ ब्राह्मणांचे प्रतिपालक आणि आर्यांचे सेवक म्हणतात.

आर्यांचा देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सद् दिता भूमाता दे तुज हाकेला
करुणावर भेदूनि ता हृदय न कां गेला
जय देव जय देव जय जय शिवराया

सावरकर या भूप्रदेशाला म्हणजेच भारताला आर्यांचा देश म्हणतात आणि त्या देशावर म्लेच्छांचा म्हणजेच मुस्लिमांचे सतत हल्ले होत असतात. त्या हल्ल्यानं पासून वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला असं सावरकर आरतीच्या पहिल्याच ओळीत लिहत आहेत.

मराठेशाही जसी गेली तशी या भूमीवरती पेशवाई आली, असं म्हटलं जात. आख्यायिका आहेत कि पेशवाईमध्ये वर्णव्यवस्थादिष्ठित अन्यायाचा कळस झालेला. मराठेशाही कधी पेशवाई बनते हे मोठं कोडं तरी आहे किंवा मग खोटं सांगून-बोलून लोकांना लुबाडण्यात तरी आलंय. पेशवाई गेली तशी इंग्रंजांचे राज्य आले. इंग्रजांनी राज्य कसे केले यावर इथल्या इतिहासकारांनी भर न देता स्वातंत्र्य सेनानी आणि त्या स्वातंत्र्य सेनानींनी देशाला इंग्रजांच्या गुलामीच्या जखडीतून बाहेर कसे काढले यावर जास्त भर देतात. स्वातांत्र्यविर बनलेला सावरकर देशातील जनतेला एकत्र करण्यासाठीच शिव-आरती लिहतात असं हि गो. स. सरदेसाई त्यांच्या “न्यू हिस्टरी ऑफ द मराठा’ च्या खंड एक मध्ये सांगतात.

श्रीमंत कोकाटे त्यांच्या शिवाजीचे खरे मारेकरी कोण? मध्ये लिहतात कि, ‘शिवाजी महाराजांचे निर्विवाद चरित्र उपलब्ध नाहीत’[3]. म्हणजे सावरकरांनी आरतीत भेसळ तर केलीच असेल यात वादच नाही. शिवाजीच्या सैन्यात काही प्रमुख स्थान मुस्लिमांकडे पण होते. जर सावरकर च्या आरती प्रमाणे बघितले तर सगळेच मुस्लिम हे हल्ले चढवायला आलेले तर सिद्धी इब्राहिम, सिद्धी हिलाल, सिद्धी वाहवाह, इब्राहिम खान, दौलत खान, दाऊद खान, नूरखान बैग, हसन खान मियांनी, मदारी मेहतर, काझी हैदर, सिद्धी मिस्त्री, शमद खान, सुलतान खान, मौलाना हैदर अली, रुस्तमे जुमानी या सगळ्यांनी मराठा साम्राज्यासाठी दिलेले योगदान, कुर्बानी हि खोटी ठरवण्याचेच षडयंत्र सावरकरांनी रचले, असे गृहीत धरायला हरकत नाही असं मला वाटत.

सावरकरांच्या आरतीत नमूद केलय कि, 

श्री जगदंबाजीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दूनी जी श्री रघुवर सरंक्षी
ती पूता भूमाता म्लेच्छांची छळता
तुझविन शिवराया तिज कोण दुजा त्राता?
जय देव जय देव जय जय शिवराया

म्हणजेच, एक काल्पनिक माता जगदंबा-भवानीने शिवाजीला तलवार दिली. म्हणजेच इतिहासाची विकृती केली. त्याच जगदंबेला मुस्लिमांनी छळायला सुरुवात केली आहे. तिची अब्रू लुटली जात आहे. सावरकर विनवणी करत आहेत त्या आरती मध्ये कि, शिवराया शिवाय त्या जगदंबेची अब्रू वाचवण्यासाठी कोणीही न्हवत.

पाठयपुस्तकीय ज्ञान सांगते कि शिवाजीची जयंती टिळकांनी सुरू केली. पण वस्तुस्थिती आणि तथ्य सांगतात कि सगळ्यात आधी क्रांतीबा फुल्यांनी शिवजयंती चालू केली. कोकाटे लिहतात कि शिवाजीचे काम घराघरात पोहचावे आणि इथल्या सडक्या मेंदूचा मुस्लिम द्वेष, जातिप्रतित लक्षणे आणि क्रिएटिव्ह अत्याचार कमी करता येईल का या उद्देशाने शिवजयंती १८७० मध्ये फुल्यांनी सुरु केली. फुल्यांनी एक पोवाडा पण लिहला.

सावरकर म्हणतात कि शिवजयंती हि टिळकांनी सुरु केली. सावरकर पुढे जाऊन देशभक्तीपर गीत लिहतात. ते असं हे हिंदु-नृसिंहा प्रभो.

हे गीत परत एकदा हृदयनाथ मंगेशकर संगीतबद्ध करतात. याच्यात सरळ सरळ शिवाजी महाराजांना हिंदूंचे राजे म्हणतात आणि परत लोकांना अजून एकदा हिंदू होऊन मुस्लिमाचा द्वेष कसा करता येईल याची शिकवण देतात.  

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

क्रांतीबा फुल्यांनी शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली. लोक एकवटू लागलेत. पेशवाईचे आद्यपूजक बाळ गंगाधर टिळक मग गणेशोत्सव काढतात. जनता आधीच गोंधळात, ती अजून जास्त भरकटली. टिळक पुढे जाऊन शिवजयंतीची तारीख आणि तिथी असा भेद करतात. ते अजूनही जसेच्या तसे आहे. टिळकांसमोर तेव्हा एक उद्देश होता कि, जेणेकरून शिवजयंतीच्या नावाखाली लोकांची एकजूट व्हायला नको. तिथी आणि जयंतीचा गोंधळ आजही सुरूच आहे. कोकाटे आपल्या पुस्तकात मांडतात कि कोण किती पोळी भाजून घेतंय; शिवाजीच्या जयंतीच्या तारखेनुसार हे हि दाखवतात.

श्रीकृष्ण आयोग आणि न्यायमूर्ती सावंत आयोग; दोघेहि आयोग 33 वर्षे लावून १९ फेब्रुवारी हि जयंती ची तारीख निश्चित करतात. कालनिर्णय कॅलेंडर चे जयंत साळगावकर हे वर्तमान पत्रात जाहिराती देतात कि तिथी नुसारच शिवजयंती साजरी व्हायला पाहिजे म्हणून. बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर आणि गजानन भास्कर मेहेंदळे जे शिवचरित्रकार शिवप्रेमी म्हणून महाराष्ट्र जनतेला माहित आहेत यांनी साळगावकरांच्या त्या पोळी भाजण्याच्या कार्यक्रमाला दुजोरा हि देतात.

क्रांतीबा फुले १८६९ मध्ये रायगडावर समाधी चा शोध लावतात आणि १८७० ला जयंती साजरी करतात. त्याच बरोबर शिवाजी वर लिहलेल्या पोवाड्यातून बहुजन वर्ग हा आपला हक्क विसरला आहे आणि त्याला कारण अज्ञान आहे असं दाखवतात. शिवाजी महाराज कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक शाक्त राजे होते हे दाखवितात.

क्रांतीबा फुले लिहतात

महाराज आम्हांसी बोला। धरला का तुम्ही अबोला ।।
मावळे गडी सोबतीला | शिपाई केले उघड्याला ।।
सोसिले उन्हातान्हाला । भ्याला नाही पावसाला ।।
डोंगर कांगर फिरला । येवन जेरीस आणला ।।
लुटले बहुत देशाला । वाढवी आपुल्या जातीला ।।
लढवी अचाट बुद्धीला । अचंबा भूमीवर केला ।।
वाटणी देई शिपायाला । लोभ द्रव्याचा नाही केला ।।
चतुर सावधपणाला । सोडिले सोडिले आधी आळसाला ।।
लहान मोठ्या पागेला । नाही कधी विसरला ।।
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला । नाही दुसरा उपमेला ।।
कमी नाही कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ।।
युक्तीने बचवी जीवाला । कधी भिईना संकटाला ।।
चोरघरती घेई किल्याला । तसेच बाकी मुलखाला ।।
पहिला झटे फितुराला । आखेर करी लढाईला ।।
युद्ध नाही विसरला । लावी जीव रयतेला ।।
टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ।।
दाद घेई लहानसानाची । हयगय न्हवती कोणाची ।।

क्रांतीबा एवढ्या सोप्या भाषेत लिहतात कि, शिवाजी जनतेचा राजा कसा होता ते स्पष्ट होऊन जाते.

लता मंगेशकरांच सावरकर प्रेम

छत्तीसगढचे माझी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मार्च 2019 ला विधान केलं होत कि ‘सावरकर यांनी दोन राष्ट्राची संकल्पना आणण्याचा विचार मांडला होता. त्यानंतर मोहम्मद जिना यांनी ती संकल्पना स्वीकारली’. यावर प्रतिक्रिया म्हणून लता मंगेशकर ट्विट करतात कि ‘नमस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या व्यक्तित्त्वाला आणि देशभक्तीला प्रणाम करते. आज काल काही लोक सावरकरांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की सावरकरजी किती मोठे देशभक्त आणि स्वाभिमानी होते’[4]. लता मंगेशकर ने बचाव केला होता का अजून काय केलं होत माहित नाही पण सावरकरांच्या बचावाला ते नेहमीच वेळोवेळी धावून येतात. जयंत साळगावकरांच्या शिवाजी जयंतीच्या तिथी समर्थनात  लता मंगेशकर पण अग्रेसर होतात. हा फक्त योगायोग म्हटला जाईल कि संघाच्या शाखांमध्ये चालणारी सावरकर लिखित शिव-आरती जी लता मंगेशकरांच्या गोड मधुर आवाजात आहे त्याला देशकार्याच म्हटलं जाईल. हे काही लपून नाहीये कि सावरकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काय होते आणि लता मंगेशकर ला भारतरत्न का देण्यात आलेला.

फुल्यांच्या पोवाडाचे अजूनही कुणाला गीत करता आलेले नाही. पण एक अति उत्तम गाणं किंवा पोवाडा जी फुल्यांच्या पोवाडाशी साधर्म्य जोडते ती म्हणजे कबीर कला मंचचे शिवबाच्या राज्यमंधी चे गीत आणि संगीत.

आम्ही शिवबाच्या औलादी


[1] निरंजन मुखोपाध्याय लिखित आर एस एस द आयकॉन ऑफ इंडियन राईट या पुस्तकात या चौघे मराठी लोकांचे देशप्रेम आणि शिवप्रेमा आड दडलेले मुस्लिम द्वेषाचा पोलखोल करण्यात आलेला आहे.

[2] शिवाजी महाराजांचे खरे मारेकरी कोण? मुघल कि ब्राम्हण.

[3] https://cdn.satyashodhak.com/wp-content/uploads/2010/09/shivrayanche-khare-shatru.pdf?fbclid=IwAR14zSVh-s1hX6qJyvgc5bP-Sx3M9Kz4S1JNUicPLGcuq1HLlIxn3WMR0EQ

[4] https://www.loksatta.com/manoranjan-news/lata-mangeshkar-tweet-on-veer-savarkar-says-those-who-criticise-him-do-not-know-about-his-patriotism-1902310/

One thought on “सावरकरांची शिव-आरती, मुस्लिमद्वेष आणि शिवाजी महाराजांचे संघीकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *